मंगळावरील कार्बन डायॉक्साइडचे बर्फ विशिष्ट हंगामात वितळल्यानंतर त्याच्या उत्तर ध्रुवावरील वालुकामय भागात खळगे तयार होत गेले असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबायटर यानाने मंगळाच्या उत्तरेकडील वालुकामय भागाचे निरीक्षण केले असता तेथे कार्बन डायॉक्साइडच्या बर्फाच्या वितळण्याने काही ठिकाणी खळगे तर काही ठिकाणी वाळूचे छोटे पर्वत तयार झाल्याचे दिसून आले. पृथ्वीवर नैसर्गिक रीत्या गोठलेला कार्बन डायॉक्साईड नाही, कार्बन डायॉक्साइडचा बर्फ तयार करावा लागतो त्याला कोरडा बर्फ असे म्हणतात. पृथ्वीवर तो घनरूपातून थेट वायुरूपात जातो. मंगळावर उन्हाळ्यात कोरडा बर्फ वितळतो. त्याची जी बाजू तेथील मातीच्या पृष्ठभागाच्या संपर्कात असते ती वितळते त्यातून वायू निर्माण होऊन त्याचा दाब पडतो व त्यामुळे खळग्याच्या रूपातील मार्गिका तयार होतात. काही वेळा हा वायू बाहेर पडताना वाळू उडवित बाहेर पडतो त्यामुळे छोटे वालुकामय पर्वत बनतात. असे असले तरी उन्हाळ्यातील वाऱ्यांमुळे तिथे खळगे हिवाळ्यापूर्वी पुन्हा भरले जातात. प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिटय़ूटचे कॅनडाइस हॅन्सन यांनी सांगितले, की ही अतिशय गतिशील पण चमत्कृतीपूर्ण प्रक्रिया आहे. मंगळावरील घडामोडी या काही अब्ज वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत पण मार्स रेकनसान्स ऑरबायटरच्या निरीक्षणानुसार अनेक प्रक्रिया मंगळावर अजूनही चालू आहेत. मंगळाची तीन वर्षे म्हणजे पृथ्वीवरची सहा वर्षे असतात, त्या कालावधीत तेथील मोसमानुसार अनेक बदल झालेले दिसतात. उन्हाळ्यात तिथे वायूंचा स्फोट होऊन वाळू वर उडते, वाळूच्या छोटय़ा पर्वतांवर हिवाळ्यात जमलेले आवरण तडकते, वालुका पर्वतांवरून वाळू घसरत जाते. हे बदल प्रत्यक्ष टिपणे फार अवघड आहे असे स्वित्र्झलडमधील बर्न विद्यापीठाचे गॅना पोर्टीकिना यांनी सांगितले. वालुकामय पर्वतात खळगे तयार करणारी ही प्रक्रिया मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर जसे कोळ्या जाळ्यासारखे आकार बनतात, तशीच प्रक्रिया आहे असे आकार उत्तर ध्रुवावर मात्र दिसत नाहीत.