भाजप आघाडीला महाआघाडीपेक्षा चार टक्के मताधिक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असतानाच आणि पहिल्या टप्प्यातील मतदानाला अद्याप एक आठवडा राहिलेला असतानाच करण्यात आलेल्या जनमत चाचणीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीपेक्षा झुकते माप देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
‘लोकनीती’ने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’साठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मतदानपूर्व चाचणी आयोजित केली होती त्यानुसार भाजप आघाडीला महाआघाडीपेक्षा चार टक्के मताधिक्य अधिक मिळणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात मतदान घेण्यात आले असते, तर एनडीएला ४२ टक्के तर महाआघाडीला ३८ टक्के मते मिळाली असती, असे आमच्या पाहणीतून सूचित होत असल्याचे लोकनीतीचे म्हणणे आहे.
डावे पक्ष आणि बसपा हे त्यापेक्षाही खालच्या स्तरावर असल्याचे म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षही कोणता विशेष प्रभाव पाडू शकणार नसला तरी प्रचारामुळे त्या पक्षाला मुस्लीम मतांची काही प्रमाणात बेगमी करता येईल, असेही लोकनीतीने म्हटले आहे.
या निवडणुकीतील दोन महाआघाडय़ांना मिळणारा पाठिंबाही सुस्पष्ट आहे. एनडीएला उच्चवर्णीय, निम्नवर्गीय अन्य मागासवर्गीय आणि दलितांचा मुख्यत्वे पासवान समाजाचा पाठिंबा मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर महाआघाडीला यादव, कुर्मी-कोएरिस आणि मुस्लीम यांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. शहरी भागांत एनडीए महाआघाडीपेक्षा अधिक मते मिळविणार असून ग्रामीण भागांत हेच चित्र उलटे असणार आहे. एनडीएने महाआघाडीपेक्षा अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये चांगली म्हणजेच ३२ वरून ५५ टक्के आघाडी घेतली आहे. इतकेच नव्हे तर यादव, कुर्मी आणि कोएरिस या वर्गातील प्रत्येक १० मतदारांपैकी दोन मतदार एनडीएचे समर्थक आहेत. त्यामुळे महाआघाडीला स्वमतांपैकी मर्यादित पाठिंबा मिळणार आहे. महाआघाडीला ५२ टक्के मुस्लिमांचा पाठिंबा असल्याचे मतदानपूर्व चाचणीत आढळले आहे आणि ३९ टक्के मुस्लीम या दोन आघाडय़ांपेक्षा वेगळा पर्याय निवडत आहेत. मतदान टप्प्यांमध्ये होणार असल्याने एका ठिकाणी झालेल्या मतदानानंतर दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या मतदानावर त्याचा राजकीय परिणाम होणार आहे. एखाद्या प्रांताने विशिष्ट आघाडीला मतदान केल्याचे आढळल्यास त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

‘रालोआ’चे सामाजिक संतुलन
राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचा कारभार जंगलराज असल्याचा प्रचार करण्यात आला, त्याला सर्वसामान्य मतदारांमध्ये पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे महाआघाडीच्या भवितव्याला धक्का पोहोचला आहे. नितीशकुमार यांना अन्य नेत्यांपेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी जास्त लोकप्रियता मिळत असली, तरी ते मते मिळविण्यात एकाकी पडणार आहेत. दुसरीकडे भाजप आघाडीला नैसर्गिक लाभ मिळणार आहे. ते केवळ १८ महिने सत्तेवर आहेत. नरेंद्र मोदी लोकप्रिय आहेत. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे त्यामुळे विकासाला मदत होते असे मानणारा वर्ग आहे. तर पासवान आणि मांझी यांचाही लाभ होणार आहे. उच्चवर्णीय, निम्न अन्य मागासवर्गीय आणि दलित यामुळे एनडीएचा पाठिंबा संतुलित राहणार आहे.