दहशतवादी अजमल कसाब याच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी येथील एका मशिदीत प्रार्थना करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी कसाबला २१ नोव्हेंबर या दिवशी फाशी देण्यात आली. त्यानंतरच्या शुक्रवारी म्हणजे २३ नोव्हेंबरला येथील एका मशिदीमध्ये नमाज अदा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली, या मृतांमध्ये कसाबचेही नाव घेण्यात आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या’ प्रार्थनेत कोण कोण सहभागी झाले होते तसेच नेमके कोणी ही आगळीक केली, याची चौकशी केली. पोलिसांकडून अद्यापही ही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, मृतांच्या त्या सूचीत कसाबचे नाव घुसडणाऱ्या इमामाची हकालपट्टी करण्यात आल्याचे या मशिदीच्या विश्वस्तांनी म्हटले आहे.