गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरील दशकभराची बंदी उठविल्यानंतर ब्रिटनने आता मोदी यांना युरोपीय संसदेच्या विशेष कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. मोदी यांनी आपल्या ब्लॉगवर ही माहिती दिली आहे.
येत्या नोव्हेंबरमध्ये ब्रुसेल्स येथे युरोपीय संसदेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला २३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर वर्षअखेरीस ब्रुसेल्स येथे होणाऱ्या एका व्यापारविषयक कार्यक्रमासाठीही आपणास आमंत्रण मिळाले आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
बंगलोर येथे सुरू असलेल्या दहाव्या ‘कॉर्पोरेट कल्चर अँड स्पिरिच्युएलिटी इंडिया कॉन्फरन्स’मध्ये सहभागी झालेल्या युरोपीय लोकप्रतिनिधींशी मोदी यांनी ऑनलाइन संवाद साधला. गुजरातने साधलेल्या विकासाबद्दल या लोकप्रतिनिधींनी मोदी यांचे अभिनंदन केले, तर मोदी यांनी त्यांना गुजरात सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. आम्ही पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देत असून आशियात सर्वाधिक सौर ऊर्जानिर्मिती करण्याचा मान लवकरच गुजरातला मिळेल, असा विश्वास मोदी यांनी या लोकप्रतिनिधींकडे व्यक्त केला.