हॅनलाँग मायनिंग इन्व्हेस्टमेण्ट या चीनमधील कंपनीच्या माजी उपाध्यक्षांना गोपनीय माहिती दुसऱ्या कंपनीला पुरवून नफेखोरी केल्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने दोन वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा ठोठावली.
बो शी झू असे या माजी उपाध्यक्षांचे नाव असून त्यांनी गोपनीय माहिती दुसऱ्याला पुरविल्याबाबतच्या तीन आरोपांची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना किमान १५ महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असे ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अॅण्ड इन्व्हेस्टमेण्ट कमिशनने एका निवेदनात म्हटले आहे.
झू यांना शिक्षा ठोठावताना न्यू साऊथ वेल्सच्या सर्वोच्च न्यायालयाने, झू यांनी कमिशनला चौकशीत केलेले सहकार्य आणि आरोपाची दिलेली कबुली याचाही विचार केला. तीन विविध कंपन्यांसमवेत काम करताना झू यांनी १.३५ दशलक्ष डॉलरची कमाई केल्याचे मान्य केले.
सनडान्स रिसोर्सेस आणि बॅनरमन या कंपन्यांची माहिती झू याने डिसेंबर २००६ ते जुलै २०११ या कालावधीत पुरविली. हॅनलाँग मायनिंगच्या अन्य अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचेही कमिशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.