अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात नाव गोवलेल्या एका मध्यस्थाबरोबर माझी एकदा भेट झाली होती, असा खुलासा या प्रकरणात इटलीतील कंपनीकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आलेले माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी बुधवारी केला. त्याचवेळी मी पूर्णपणे निर्दोष असल्याचेही त्यांनी सांगितले. 
मध्यस्थीचा आरोप असलेल्या कार्लो यांच्याशी माझी माझ्या नातेवाईकांच्या घरी भेट झाली होती. पण माझा त्यांच्याबरोबर कोणताही दैनंदिन संपर्क नव्हता. माझा त्यांच्याशी संपर्क असण्याचे काहीही कारण नव्हते. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठीची कंत्राटही २०१०मध्येच झाले, याकडे त्यागी यांनी लक्ष वेधले.
भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर खरेदी करताना इटलीच्या ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीने भारताचे तत्कालिन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांना मध्यस्थामार्फत लाच दिल्याची माहिती इटलीतील प्राथमिक तपासात मंगळवारी पुढे आली. याप्रकरणी इटलीतील तपास पथकातील अधिकाऱयांनी दिलेल्या अहवालात त्यागी यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे.