गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलीत काढलेला तो फोटो बॉलिवूडमधील चित्रपटात विनापरवानगी वापरल्याबद्दल कुतूबुद्दीन अन्सारी यांनी राजधानी एक्स्प्रेसच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. चित्रपटात हा फोटो वापरल्यामुळे मला मानसिक त्रास झाला असून, निर्मात्याने त्याची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, असे नोटिसीत म्हंटले आहे.
गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये सुरक्षारक्षकांकडे हात जोडून स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्याची दयायाचना करणारे अन्सारी यांचा फोटो एका छायाचित्रकाराने काढला होता. नंतर तो फोटो कायम या दंगलींशी जोडला जाऊ लागला. इंटरनेटवरही त्या फोटोचा मोठा प्रसार झाला. गुजरातमधील दंगलीचे प्रतिक म्हणून तोच फोटो वापरला जाऊ लागला. या फोटोमुळे अन्सारी यांच्या अडचणीत भर पडली.
अन्सारी यांचा हाच फोटो राजधानी एक्स्प्रेस चित्रपटात वापरण्यात आल्याने त्यांनी त्याविरोधात पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या वकिलामार्फत त्यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली.
आम्ही या चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य दिग्दर्शक दोघांनाही कोणत्याही परवानगीशिवाय अन्सारी यांचा फोटो चित्रपटात वापरल्याबद्दल नोटीस पाठविली आहे. या फोटोमुळे आमच्या अशिलांना आणि त्यांच्या कुटूंबियांना तीव्र मानसिक ताप झाला असल्याचे आमचे म्हणणे असल्याचे अन्सारी यांचे वकील अमित नायर यांनी सांगितले.
गुजरात दंगलींशी सातत्याने स्वतःचे नाव जोडले जात असल्यामुळे अन्सारी सध्या वैतागलेले आहेत. राजधानी एक्स्प्रेसच्या निर्मात्यांकडून त्यांनी २५ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.