ईशरत जहा- सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणात आरोपी असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी डी.जी. वंझारा यांची बुधवारी साबरमतीच्या मुख्य कारागृहातून जामीनावर सुटका  झाली. गेल्या साडेसात वर्षांपासून कारागृहात असणाऱ्या वंझारा यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर माझे आणि गुजरातच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया दिली. 

यावेळी त्यांनी गुजरात पोलीसांना राजकीय कारणांसाठी लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. देशाच्या प्रत्येक राज्यातील पोलीस दहशतवादाविरुद्ध लढा देत आहेत. मात्र, गेल्या आठ वर्षांच्या काळात गुजरात पोलीसांना पूर्वी सत्तेत असणाऱ्या राजकीय शक्तींकडून लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. उत्तर प्रदेशात एनकाउंटर्सची संख्या सर्वाधिक होती, तर गुजरातमध्ये देशातील सर्वाधिक कमी एनकाउंटर्स झाले होते. मात्र, तरीही गुजरात पोलीस दलाला जाणुनबुजून लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, वंझारा यांच्या स्वागतासाठी बुधवारी त्यांच्या शेकडो समर्थकांनी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी त्यांना ईशरत जहॉ प्रकरणात स्थानिक न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता. तर सोहराबुद्दीन शेख आणि तुलसी प्रजापती चकमकप्रकरणातही त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावरील सर्व खटल्यांचे निकाल एकत्र करण्यात आले. वंझारा गुजरातमधून बाहेर राहतील, या अटीवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
२४ एप्रिल २००५ रोजी सीआयडीने त्यांना सोहराबुद्दीन शेख चकमकप्रकरणी अटक केली होती. तेव्हापासून वंझारा हे कारागृहातच होते. डी.जी. वंझारा हे तत्कालीन पोलीस सेवेत असताना गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते. त्यानंतर सीबीआयने त्यांना शेख, प्रजापती आणि ईशरत जहॉ प्रकरणात आरोपी बनविले होते.