भारत आणि पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या आणि पाकिस्तान लष्कराकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पहिलीच ब्रिगेडीअर स्तरावरील बैठक उद्या पूँछ जिल्ह्यात होणार आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तान लष्कराने भारतीय सीमेत घुसखोरी करून दोन सैनिकांना ठार मारुन त्यांचे शीर पाकिस्तानात पळवून नेल्याचे वृत्त आहे. या सैनिकांचे शीर परत करण्याची मागणी या बैठकीत भारताकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर भारताकडून झालेल्या गोळीबारात पाकिस्तान लष्कराचा एक सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तान लष्कराचे म्हणणे आहे. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान लष्करा दरम्यान सीमारेषेवर सतत गोळीबाराच्या घटना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही ब्रिगेडीअर स्तरावरील ध्वजबैठक उद्या दुपारी बाराच्या सुमारास घेण्यात येणार आहे.