झारखंडमध्ये राजकीय स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.
झारखंड राज्य खनिज आणि नैसर्गिक स्रोतांनी समृद्ध आहे, मात्र राजकीय अस्थैर्यामुळे येथील जनता गरीबच राहिली आहे, असे मोदी यांनी येथे एका जाहीर सभेत सांगितले.
जनतेने भाजपला बहुमत द्यावे कारण आघाडीच्या राजकारणामुळे किती समस्यांना तोंड द्यावे लागते त्याची जनतेला कल्पना आहे, राज्यातील नैसर्गिक स्रोतांचा वापर विकासासाठी केला जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी या वेळी दिले.
झारखंडमधील मतदारांनी ‘चहावाल्या’वर विश्वास ठेवावा आणि भाजपला बहुमत द्यावे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यांप्रमाणेच झारखंडचा विकास केला जाईल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.