योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली’ या आयुर्वेद कंपनीची सर्व उत्पादने आता ‘बिग बाजार’मध्ये उपलब्ध होणार आहेत. ‘फ्युचर ग्रुप’सोबत पतंजलीने हातमिळवणी केली असून ‘फ्युचर ग्रुप’च्या ‘बिग बाजार’सह इतर आऊटलेट्समध्ये लवकरच पतंजलीची उत्पादनं ग्राहकांना विकत घेता येणार आहेत. बाबा रामदेव आणि फ्यूचर ग्रुपचे प्रमुख किशोर बियाणी यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन याबाबत माहिती दिली.

स्वदेशी उत्पादनांचे अभियान पुढे घेऊन जाण्यासाठी उत्तम व्यासपीठाची गरज होती. त्यामुळे गेले अनेक दिवस आम्ही रिटेल ब्रँडच्या शोधात होतो आणि ‘फ्युचर ग्रुप’च्या रुपाने तो ब्रँड आम्हाला गवसला आहे. पतंजली आणि फ्युचर ग्रुप स्वदेशीच्या अभियानाला पुढे घेऊन जातील, असा विश्वास यावेळी रामदेव बाबा यांनी व्यक्त केला. तर, पुढील २० महिन्यांत पतंजलीची उत्पादनं विकून एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा मानस असल्याचे, किशोर बियाणी यांनी सांगितले. पतंजलीची उत्पादनं विश्वासार्ह आहेत आणि कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग देखील आहे. त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल, असेही किशोर बियाणी पुढे म्हणाले. विशेष म्हणजे, पतंजली पुढच्याच आठवड्यात स्वदेश मॅगी बाजारात दाखल करणार आहे. त्यामुळे ‘बिग बाझार’मधील नेस्लेच्या मॅगीची जागा आता पतंजलीची ‘स्वदेशी मॅगी’ घेईल.