माजी हवाईसुंदरी गीतिका शर्मा हिच्या आईच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा आणि त्यांची सहायक अरुणा चढ्ढा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अनुराधा शर्मा यांनी दिल्लीतील अशोकविहार संकुलातील आपल्या घरात पंख्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. 
अनुराधा शर्मा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये कांडा आणि चढ्ढा यांचे नाव असल्यामुळे त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी गोपाळ कांडा याच्या कथित छळवणुकीवरून गीतिका शर्माने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता तिच्या आईनेही आत्महत्या केल्याचे दिसून आल्यावर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. कांडा आणि चढ्ढा हे दोघेही गीतिका आत्महत्याप्रकरणात आधीपासूनचे न्यायालयीन कोठडीत आहेत.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या दोघांवर नोंदविण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱयाने सांगितले.