ग्लोबल वॉर्मिग १९९८ मध्येच थांबल्याचा इंग्लंडच्या हवामानशास्त्र संशोधकांचा दावा

ज्या ग्लोबल वॉर्मिगच्या नावाने रोज विकसित व विकसनशील देश यांच्यात तू-तू मैं मैं सुरू

पीटीआय/लंडन | January 9, 2013 05:32 am

ज्या ग्लोबल वॉर्मिगच्या नावाने रोज विकसित व विकसनशील देश यांच्यात तू-तू मैं मैं सुरू आहे ते ग्लोबल वॉर्मिग (जागतिक तापमानवाढ) १९९८ मध्येच थांबले आहे व येत्या काही वर्षांत पृथ्वीचे तापमान जी भीती व्यक्त केली जाते तसे वाढणार नाही, असा दावा इंग्लंडमधील हवामानशास्त्र संशोधकांनी केला आहे.
येत्या पाच वर्षांत तापमानाची पातळी १९७१-२००० या काळात जे तापमान होते त्यापेक्षा फार तर ०.४३ अंशांनी ते वाढेल. अगोदर तापमानातील ही वाढ ०.५४ अंश असेल असे सांगण्यात आले होते, त्यामुळे आता हा अंदाज वीस टक्क्य़ांनी घसरला आहे. १९९८ मध्ये जी तापमानवाढ झाली त्याच्यापेक्षा ही वाढ ०.४ अंशांनी जास्त असेल. अतिशय वेगळ्या हवामान परिणामांमुळे ती घडून येईल असे डेली मेलने या संशोधकांच्या हवाल्याने म्हटले आहे. १९९८ मध्ये तापमानातील वाढ ०.०३ अंश होती; म्हणजे याचा अर्थ असा की, यापुढे येत्या काही वर्षांत पृथ्वीच्या तापमानात फार मोठी वाढ होणार नाही.
अलीकडच्या काही दशकात हरितगृहवायूंचे प्रमाण वाढले असले तरी ग्लोबल वॉर्मिग वाढलेले नाही. जागतिक तापमान जवळपास २०१७ पर्यंत वाढणार नाही, म्हणजे किमान वीस वर्षे तापमानात कुठलाही मोठा बदल संभवत नाही असे जागतिक तापमानवाढ धोरणाचे सल्लागार डॉ. डेव्हीड व्हाइटहाऊस यांनी सांगितले. इ.स. २००० पासून ग्लोबल वॉर्मिग थांबले असे म्हणता येणार नाही, पण १९७० च्या दशकाच्या तुलनेत ते फारच कमी प्रमाणात झाले असा दावा युनिव्हर्सिटी ऑफ रिंडींगचे डॉ. रीचर्ड अ‍ॅलन यांनी केला आहे.  असे असले तरी हरितगृहवायूंमुळे महासागरांच्या तळाशी तापमान वाढत आहे हे मात्र अ‍ॅलन यांनी मान्य केले. त्यांच्या या दाव्याला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे बॉब वॉर्ड यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मते  ग्लोबल वॉर्मिग म्हणजे जागतिक तापमानवाढ थांबली असे म्हणणे चुकीचे आहे.
२००९ च्या कोपनहेगन परिषदेनंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. माइल्स अलेन यांनी जागतिक तापमानवाढ मोठय़ा प्रमाणात होत आहे व ती आपल्याला वाटते त्यापेक्षा भयानक वेगाने वाढते आहे असे म्हटले होते. कमी मुदतीच्या हवामान प्रारूपांच्या आधारे अशा प्रकारचे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे असेही त्यांनी सांगितले.

First Published on January 9, 2013 5:32 am

Web Title: global warming has stalled since 1998 uk met office