गेल्या वर्षी ज्या देवकणाचा म्हणजे हिग्ज बोसॉनचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला आहे तो कण कालांतराने विनाशास कारणीभूत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. त्यांच्या मते या कणाच्या वस्तुमानावर विश्वाचे भवितव्य अवलंबून राहील. जीनिव्हा येथील लार्ज हैड्रॉन कोलायडरमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात देवकणाचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित हिग्ज बोसॉनचे वस्तुमान हा महत्त्वाचा घटक असून त्याच्या गणनातून अवकाश व काळ यांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
बटाविया येथील फर्मी नॅशनल अ‍ॅक्सिलरेटर लॅबोरेटरीत कार्यरत असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ लिकेन यांनी सांगितले की, भविष्यात दहा हजार अब्ज वर्षांनी अशी दुर्घटना घडेल, ज्यामुळे विश्वच नष्ट होईल व त्याचे भाकीत या हिग्ज बोसॉनच्या वस्तुमानावरून करता येऊ शकते. अजून १० हजार अब्ज वर्षांच्या कालावधीनंतर विश्व हे अस्थिर होईल व नंतर नष्ट होईल असे लिकेन यांचे मत आहे. अणूचे जे सूक्ष्म उपकण आहेत,ते विश्वातील ऊर्जेचा आविष्कार आहेत, त्या ऊर्जा क्षेत्रांना ‘हिग्ज क्षेत्र असे म्हणतात. त्यामुळे कणांना वस्तुमान असते, असे सांगून ते म्हणतात की, एलएचसी म्हणजे लार्ज हैड्रॉन कोलायडरच्या प्रयोगात जुलै २०१२ मध्ये ज्या कणाचा शोध लागला त्याचे गुणधर्म हे हिग्ज बोसॉनसारखे आहेत. या कणाची ओळख पटवण्यासाठी अजून माहितीची गरज आहे, पण तो हिग्ज बोसॉन असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. पेनसिल्वानिया विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ क्रोल यांच्या मते हिग्ज बोसॉनचा शोध हा आश्चर्यकारक आहे. तो कण आहे व नाहीही; पण तो तिथे आहे हे सिद्ध करता आले ही मोठी कामगिरी आहे. जर तो खरेच हिग्ज बोसॉन असेल तर त्यामुळे कणांना वस्तुमान कसे प्राप्त होते याचा सिद्धांत खरा ठरेल. जर तो खरेच हिग्ज बोसॉन असेल तर विश्वाला अस्थिर करणारे वस्तुमानच असेल व त्यामुळे विश्व नष्ट होणार आहे हे स्पष्ट होईल. हिग्ज बोसॉन जर सगळीकडे आहे तर विश्वातील अवकाश व काळ यांच्यातील जी निर्वात पोकळी आहे त्यावर तो परिणाम करील. हिग्ज बोसॉनचे वस्तुमान किती आहे यावर ही पोकळी किती स्थिर आहे हे ठरणार आहे, असे ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक ख्रिस्तोफर हिल यांचे मत आहे. जर हिग्ज बोसॉनचे वस्तुमान हे अपेक्षेपेक्षा काही टक्क्य़ांनी वेगळे असेल तरी विश्वाचा अंत होणार नाही अशीही एक आशा आहे.