लाचखोरीचा आरोप झालेला अतिमहत्त्वाच्या व्यकींसाठीचा हेलिकॉप्टर खरेदी करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी प्रक्रिया सुरू केली. इंग्लंडमधील ऑगस्टावेस्टलॅंड कंपनीला केंद्र सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा करार रद्द का करण्यात येऊ नये, असा प्रश्न नोटिसीत उपस्थित करण्यात आला असून, सात दिवसांत उत्तर द्यावे, असेही म्हणण्यात आले आहे.
ऑगस्टावेस्टलॅंडकडूनच हेलिकॉप्टर खरेदी करावेत, यासाठी कंपनीने मध्यस्थांमार्फत अनेकांना लाच दिल्याचे इटलीमध्ये झालेल्या तपासात स्पष्ट झाले होते. माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांनाही लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यापार्श्वभूमीवर सर्वच बाजूंनी केंद्र सरकारवर टीका होऊ लागल्याने हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रक्रिया सुरू केली. करारापोटी कंपनीला देण्यात येणारी रक्कम तूर्त स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ऑगस्टावेस्टलॅंडबरोबर करार करण्यात आला होता. मात्र, हा करार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचखोरी झाल्याचे इटलीतील तपास पथकाने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी ऑगस्टावेस्टलॅंडचे तत्कालीन प्रमुख आणि फिनमेकानिका कंपनीचे सीईओ जोजेफ ओर्सी यांनीही अटक करण्यात आली आहे.