अफजल गुरुचा मृतदेह केंद्र सरकार त्याच्या कुटुंबियांकडे परत देण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती पुढे आली आहे. अफजलचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्याची त्याच्या पत्नीची मागणी केंद्र सरकार फेटाळणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते. यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱयाने सांगितले. 
अफजलची पत्नी तब्बसूम हिने बारामुल्लामधील पोलिस उपायुक्तांना पत्र लिहून अफजलचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. ते पत्र जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे पाठविले.
गृह मंत्रालयाचा अधिकारी म्हणाला, कारागृहाच्या नियमावलीप्रमाणे अफजलचा मृतदेह कारागृहात दफन करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती व इतर परिणाम लक्षात घेता त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे देण्याचा सध्यातरी कोणताही विचार नाही.
अफजलला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोऱयात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण खोऱयातील जनजीवन विस्कळीत झाले होते. ते सोमवारी पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत होते.