केंद्राने दिलेल्या निधीचा गुजरात सरकारकडून गैरवापर करण्यात आला. विकासाचे खोटे दावे करून, बनावट प्रतिमा निर्मिती करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात आला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी केला. गांधीनगर जिल्ह्यातील कलोल या गावी प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, ‘‘शेतीच्या विकासासाठी तसेच इतर योजनांसाठी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने (यूपीए) राज्याला त्याच्या वाटय़ाचा निधी उपलब्ध करून दिला, पण सरकारच्या न केलेल्या कामगिरीचे ढोल बडविण्यासाठी त्याचा गैरवापर करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तुलनेत यूपीए सरकारने ५० टक्के जादा निधी राज्याला दिला. मात्र तो विशिष्ट लोकांसाठी आणि उद्योगपतींसाठी खर्च करण्यात आला. सामान्य माणसाला त्याचा काहीही लाभ झाला नाही.’’
‘‘केंद्र सरकार प्रत्येक वर्षी गुजरातला ३१२८ मेगावॉट वीज देते. त्यातील ८०० मेगावॉट वीज नफा कमावण्यासाठी विकली जाते. वीज मिळावी म्हणून ताटकळत असलेल्या लोकांवर हा अन्याय आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकांना पुन्हा मोठी स्वप्ने दाखवून भुलविले जात आहे. त्यांची दिशाभूल केली जात आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नवी साधने वापरली जात आहेत. सीमेवरील सुरक्षेसारखे प्रश्न उपस्थित करून लोकांच्या भावना भडकावल्या जात आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या ऐक्यासाठी बलिदान केले. आम्ही कोणत्याही स्थितीत कोणालाही राष्ट्रीय ऐक्याशी खेळ करू देणार नाही,’’ असे सोनिया यांनी सांगतले.