गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेल्यांनतर सोमवारी दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. या फेरीतील उमेदवारांत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही भवितव्य मतदार ठरविणार आहेत.
विधानसभेच्या ८७ जागांसाठी पहिल्या फेरीत मतदान झाले होते. आता उरलेल्या ९५ जागांसाठी मतदान होत आहे. मध्य गुजरातमधील पाच जिल्ह्य़ांतील ४०, उत्तर गुजरातमधील पाच जिल्ह्य़ांतील ३२ तसेच अहमदाबाद शहरातील १७ आणि कच्छ जिल्ह्य़ातील सहा मतदारसंघांत मतदान होणार आहे. मतमोजणी २० डिसेंबरला होईल.
दुसऱ्या फेरीत ८२० उमेदवारांचे भवितव्य एक कोटी ९८ लाख मतदार ठरविणार आहेत.
 या फेरीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे मणिनगरमधून उभे आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने राज्य सरकारविरोधात कायदेशीर लढाई लढत असलेले पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी श्वेता यांना उमेदवारी दिली आहे. या फेरीत राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांचेही राजकीय भवितव्य ठरणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला, त्यांचे पुत्र महेंद्र वाघेला, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ पटेल हेसुद्धा रिंगणात आहेत.
हल्ल्यात ठार झालेले भाजपचे माजी मंत्री हरेन पंडय़ा यांच्या पत्नी जागृती पंडय़ा यांना भाजपतील बंडखोर नेते केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पक्षाने अहमदाबादमधून उमेदवारी दिली आहे.