मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्करए-तयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हफीझ सईदला या हल्ल्यावरून पाकिस्तानने कधीही अटक केली नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांचे याबाबतचे विधान दिशाभूल करणारे असल्याचे शिंदे म्हणाले.
सईद बाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चुकीची माहिती दिली आहे. त्याला २६/११ च्या हल्ल्याखेरीज अन्य कारणांमुळे अटक झाली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. हफीझ सईदला २६/११ च्या हल्ल्यात सहभागी झाल्याच्या कारणामुळे अटक करण्यात आली होती अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी आपल्याला दिली होती. सईदला आजवर तीनदा अटक करण्यात आली होती, मात्र अधिक पुराव्याच्या अभावी त्याची सुटका करण्यात आली असे मलिक यांनी आपल्याला चर्चेदरम्यान सांगितले असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
या प्रकरणाचा भारताने पाठपुरावा केल्यानंतर सईदच्या अटकेची कागदपत्रे पाकिस्तानने आपल्याकडे सोपविली आहेत, त्यामध्ये त्याच्या अटकेचे कारण वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.यापूर्वी मलिक यांच्या वादग्रस्त विधानांना चोख उत्तर न दिल्याबद्दल भाजपने केंद्र सरकारवर लोकसभेत टीका केली. हफीझ सईद व २६/११ हल्ल्यातील अन्य सुत्रधारांचे भारताकडे हस्तांतरण झाल्याखेरीज पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा सुरु करु नये अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली.