पटेल समाजाला ओबीसींचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेले आंदोलन आता थेट अमेरिकेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या पटेल समाजाने त्यासाठी कंबर कसली असून मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये पटेल समाजाचे नागरिक मोदींविरोधात निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. नरेंद्र मोदी येत्या २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी मोदींना लक्ष्य करण्याची योजना पटेल समाजाने आखली आहे. अमेरिका दौऱ्यादरम्यान सॅन जोसमधील सॅप केंद्र मोदींच्या भेटीचा दुसरा टप्पा आहे. याठिकाणीही आपली मागणी रेटण्यासाठी पटेल समाज एकत्र येणार आहे.
अमेरिका-कॅनडातील सरदार पटेल गटाचे समन्वयक अल्पेश पटेल या आंदोलनाची सूत्रे हाताळत असून त्यांनी स्थानिक पोलिसांकडून या आंदोलनासाठी परवानगी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी एक फेसबुक पेज तयार करण्यात आले असून त्यावर अवघ्या २४ तासात आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार असलेल्या पटेल समाजाच्या १००० जणांनी स्वत:ची नावे नोंदविली आहेत. मात्र, न्यूयॉर्कमधील या आंदोलनसाठी किमान पाच हजार लोक जमविण्याची आमची योजना असल्याचे अल्पेश यांनी सांगितले. अल्पेश पटेल हे अमेरिकेच्या न्यू जर्सीतील उद्योजक आहेत. मायदेशी असलेल्या आमच्या गरीब बांधवांसाठी आम्ही हा लढा देत आहोत. भारतामध्ये आमच्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आई-वडिलांना घरदार विकावे लागत आहे. भारतातील जाचक आरक्षण व्यवस्थेमुळेच आज पटेल समाजातील तब्बल दहा हजार डॉक्टर्स आणि इंजिनियर्स अमेरिकेत स्थायिक झाल्याचा दावाही अल्पेश यांनी केला. दरम्यान, आम्हाला हे आंदोलन मागे घेण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मध्यस्थांकडून अनेक दुरध्वनी आल्याचेही त्यांनी सांगितले.