पटेलांच्या ओबीसी आरक्षणाचा आवाज देशभर पोहोचवला जाईल, असे म्हणत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आज दिल्लीत पोहोचला आहे. पटेल आरक्षणासाठी जाट आणि गुज्जर समाजाच्या नेत्यांच्या भेटीसाठी हार्दिक पटेल आज दिल्लीत दाखल झाला.
काही दिवसांपूर्वी पटेलांना ओबीसी आरक्षण द्यावे, यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात गुजरातमध्ये आंदोलन पेटले होते.  ज्यात नऊ जणांचा मृत्यू ,तर  कोट्यवधींचे नुकसानही झालं होतं. त्यावेळी आमचे आंदोलनकर्ते शांतच होते, पोलिसांनीच हिंसा घडवल्याचे हार्दिकने म्हटले. आम्ही दिल्लीत भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी आलो आहोत. तसेच, आज प्रत्येक समाज दुःखी असल्याने त्याला आरक्षण हवे आहे. पटेल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा देशभरात पोहोचवणार, जिथे जिथे पटेल समाजाला माझी गरज असेल तिथे मी जाणार असे म्हणत पटेल समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीतील जंतर मंतर व लखनौत आंदोलन करणार असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, पटेल आंदोलनात गुजरात पोलिसांनी ज्या आंदोलकांना ताब्यात घेतले होते, त्यापैकी एकाचा आज कोठडीत मृत्यू झाला आहे. श्वेतांग पटेल असे मृत तरुणाचं नाव असून त्याच्या मृत्यूमागचे नेमक कारण अद्याप स्पष्ट नाही.