इंडियन प्रिमीअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व रद्द करण्याचा निर्णय भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने घेतला. दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक बोली लावून हिरो मोटोकॉर्पने मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व आपल्याकडे घेतले होते. मात्र, आता हा करार संपुष्टात येण्यास एक वर्ष शिल्लक असतानाच कंपनीने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनसोबतच्या प्रायोजकत्वाच्या कराराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय तीन दिवसांपूर्वीच हिरो मोटोकॉर्पने घेतला होता. त्यानंतर लगेचच कंपनीने मुंबई इंडियन्सचे प्रायोजकत्व रद्द केले. २०११ मध्ये कंपनीने मुंबई इंडियन्स संघाला प्रायोजकत्व देण्यासाठी आयपीएलमधील सर्वांत मोठा दीड कोटी डॉलरचा करार केला होता. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यापासून आयपीएलमध्ये आहे, हे लक्षात घेऊन त्यांच्यासोबतचे संबंध आणखी दृढ करण्याच्या हेतून हिरो मोटोकॉर्पने त्यांना प्रायोजकत्व दिले होते. ‘हिरो’ने हॉकी फेडरेशनसोबत प्रायोजकत्वाचा करार केल्यामुळे पुढील चार वर्षे हॉकीची एकतरी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होणार आहे.