अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीपद भूषविलेल्या हिलरी क्लिंटन या सार्वजनिक भाषणांसाठी तयार झाल्या असून मात्र प्रत्येक भाषणासाठी त्या तब्बल दोन लाख अमेरिकन डॉलर एवढे मानधन आकारणार आहेत. विशेष म्हणजे परराष्ट्रमंत्रीपदाच्या वार्षिक वेतनापेक्षा हा आकडा पुढे आहे!
वयाची पासष्ठी गाठलेल्या हिलरी यांना परराष्ट्रमंत्री म्हणून वर्षांला एक लाख ८६ हजार डॉलर इतके वेतन मिळत होते. हिलरी यांच्या भाषणाचे कार्यक्रम घेण्याचे काम न्यूयॉर्कमधील हॅरी वॉकर एजन्सी पाहाणार आहे. हीच एजन्सी बिल क्लिंटन यांच्यासाठीही याच धर्तीचे काम गेली काही वर्षे पाहात आहे. अर्थात हिलरी या काही भाषणे मात्र स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसाठीही देणार असून भाषणाचे सर्व मानधन त्या संस्थेला दिले जाणार असल्याचे समजते.
सीएनएनच्या माहितीनुसार क्लिंटन यांनी ११ वर्षांच्या कालावधीत या एजन्सीच्या माध्यमातून ४७१ भाषणे दिली असून प्रत्येक भाषणामागे एक लाख ८९ हजार डॉलर एवढे मानधन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे.