भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुकराराच्या मुद्दय़ावरून आधी भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी नंतर घूमजाव करत या मुद्दय़ावर भारताचा कैवार घेतल्याचा आरोप होत आहे. मात्र, हिलरी यांनी हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. पुढील वर्षी होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हिलरी यांनी वातावरणनिर्मितीला सुरुवात केली असतानाच ‘क्लिंटन कॅश : द अनटोल्ड स्टोरी ऑफ हाऊ अँड व्हाय फॉरिन गव्हर्नमेंट्स अँड बिझनेसेस हेल्प मेक बिल अँड हिलरी रिच’, या पुस्तकाद्वारे त्यांच्या विरोधकांनी हिलरी यांना लक्ष्य केले आहे. हे पुस्तक ५ मे रोजी प्रकाशित होत आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वाचा मुद्दा असलेल्या अणुकराराबाबत २००६ मध्ये हिलरी यांची प्रथमत: भारतविरोधी भूमिका होती. मात्र, त्याच वर्षीच्या जूनमध्ये त्यांनी आपली भूमिका बदलून हा करार भारताच्या हिताचा असल्याचे विवेचन केले. तसेच भारताची भलामणही केली. याच कालावधीत क्लिंटन फाऊंडेशनला भारतातून मोठय़ा प्रमाणात देणग्या प्राप्त झाल्याचा आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचा लेखक पीटर श्वेझर यांनी त्यासाठी पुरावेही सादर केलेले आहेत. अमेरिकेतील भारतीय उद्योजक संतसिंग चटवाल यांनी या प्रकरणी पुढाकार घेत क्िंलटन फाऊंडेशनला मोठमोठय़ा देणग्या प्राप्त करून दिल्या. तसेच माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे लंडन येथे भाषण आयोजित करून साडेचार लाख पौंडांचा निधी जमवला, असे श्वेझर यांनी नमूद केले आहे. तसेच ‘२००६ मध्ये हिलरी या अणुकराराच्या विरोधक होत्या. मात्र, त्यांच्या फाऊंडेशनला मोठमोठय़ा देणग्या दिल्या तेव्हा त्यांनीही आपल्या भूमिकेत बदल केला. अमेरिकी राजकारणात काहीही मोफत मिळत नाही’, असे चटवाल यांनी म्हटल्याचेही पुस्तकात नमूद आहे. याच चटवाल यांना २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे, हे विशेष.
दरम्यान, क्लिंटन यांचे प्रवक्ते जोश श्वेरिन यांनी पुस्तकातील सर्व आरोप फेटाळून लावत हिलरी यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा त्यांच्या विरोधकांचा कुटील डाव असल्याचा आरोप केला आहे.