ज्येष्ठ टीकाकार आणि भाष्यकार एम. एम. बशीर यांनी ‘मातृभूमी’ या मल्याळी भाषेतील दैनिकात ऑगस्ट महिन्यापासून ‘रामायणा’वर स्तंभलेखन करत होते. त्यांनी संपादकांना एकूण सहा लेख दिले. मात्र यापैकी पाच लेख छापून आल्यावर मुस्लीम असताना रामायणावर लिहिल्याबद्दल त्यांची अज्ञातांकडून दूरध्वनीवरून निर्भर्त्सना होऊ लागल्याने पाचव्या लेखानंतरच त्यांच्यावर ही लेखमालिका थांबविण्याची वेळ आली आहे.
केवळ बशीर यांनाच नव्हे तर पहिला लेख प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्तपत्राच्या संपादकांनाही शिवीगाळ करणारे दूरध्वनी आले आहेत. ‘श्री रामाज अँगर’ या शीर्षकाखाली ३ ऑगस्ट रोजी पहिला लेख आला होता. त्यानंतर चार दिवसांनी पाचवा लेख प्रसिद्ध झाला आणि बशीर यांनी लेखमालिका बंद केली.
दरदिवशी आपल्याला त्याच प्रकारचे दूरध्वनी येत असून रामायणावर लिहिल्याबद्दल दूषणे दिली जात आहेत. वयाच्या ७५व्या वर्षी आपल्यावर केवळ मुस्लीम असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे शल्य बशीर यांना टोचत आहे. ही बाब सहन न झाल्याने आपण लेखमालिका बंद केली असे बशीर यांनी कोझिकोड येथील आपल्या निवासस्थानाहून दूरध्वनीवरून ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला ही माहिती दिली.
मुस्लीम असल्यानेच टीका
श्रीरामचंद्रांवर टीका करण्याचा आपल्याला अधिकार काय, अशी विचारणा होत होती. आपली लेखमाला वाल्मीकी रामायणावर होती. दूरध्वनी करणाऱ्या बहुसंख्य जणांनी आपले स्पष्टीकरण ऐकण्याची तसदीही घेतली नाही. मात्र आपण मुस्लीम असल्यानेच रामाच्या कृत्यांबाबत लिहिले, अशी दूषणे अनेकांनी आपल्याला दिली.