प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमेरिका व भारतात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. पंडित रविशंकर यांचे नुकतेच कॅलिफोर्निया येथे निधन झाले होते. या दोन्ही श्रद्धांजली सभा त्यांच्या कॅलिफोर्निया व भारतातील त्यांच्या घराजवळ होणार असून त्या वेळी त्यांचे कुटुंबीय, मित्र रविशंकर यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली वाहू शकतील.
त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रविशंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१३ मध्ये न्यूयॉर्क व लंडन येथे संगीत मैफलींचे आयोजन केले जाणार असून त्याचा तपशील नंतर जाहीर केला जाणार आहे.
पंडित रविशंकर यांच्या निधनानंतर जगभरातून आलेले शोकसंदेश पाहून रविशंकर यांच्या कुटुंबीयांनी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांची कन्या अनुष्काशंकर हिने फेसबुक पेजवर म्हटले आहे, की तुमच्या शोकसंदेशांबाबत व जागवलेल्या आठवणींबाबत मी सर्वाची ऋणी आहे. जगभरातून व्यक्त झालेल्या शोकसंवेदनांमुळे माझ्या वडिलांची माझ्या मनातील प्रतिमा आणखी लख्ख व सुंदर झाली आहे. माझे वडील त्यांच्या संगीतातून जिवंतच राहतील, मला वाटते ते अजूनही माझ्या आजूबाजूलाच आहेत.
रविशंकर यांच्या दुसऱ्या कन्या नोरा जोन्स यांनी रविशंकर यांचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवर टाकला आहे. त्यात त्या म्हणतात, की पहिली चित्रफीत ही ते ५१ वर्षांचे असतानाची आहे तर दुसरी ते ९२ वर्षांचे असतानाची आहे, बाबा, तुम्ही आमची प्रेरणा आहात, तुमची आठवण सतत येत राहील.
रविशंकर यांच्या पत्नी सुकन्या शंकर यांनी म्हटले आहे, की ते नेहमी लोकांचेच होते, लोकांवर त्यांनी प्रेम केले व त्यांना भरभरून संगीताचा आनंदही दिला.