निदर्शने करण्यासाठी अकस्मात प्रचंड संख्येत प्रगटणाऱ्या जमावाला (फ्लॅश मॉबला) हाताळण्यासाठी स्वतंत्र पद्धतीची आवश्यकता आहे, असे मत अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
दिल्लीच्या विजय चौक आणि राजपथवर शनिवार आणि रविवारी झालेल्या उग्र निदर्शनांना हाताळताना पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे मारले आणि गर्दी जमू नये म्हणून मेट्रो रेल्वे स्थानके बंद केली होती. फ्लॅश मॉब प्रकार नवा आहे आणि त्याला हाताळण्यासाठी पोलीस पुरेसे सज्ज असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे मत चिदम्बरम यांनी व्यक्त केले.दरम्यान, शनिवार आणि रविवारी उग्र निदर्शनांचे केंद्रस्थान बनलेल्या इंडिया गेट परिसरातील स्थिती बुधवारी बऱ्याच अंशी पूर्ववत झाली. या प्रकरणावरून आता राजकीय वितंडवाद सुरू झाले असून, सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त नीरजकुमार यांची उचलबांगडी करण्याची मागणी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे खासदारपुत्र संदीप दीक्षित यांनी केली आहे. मात्र या मागणीशी काँग्रेस पक्षाचा संबंध नसल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी बुधवारी स्पष्ट केले.