दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर सिंगापूर येथे मरण पावलेल्या तरुणीच्या पार्थिवावर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटे तिचे पार्थिव सिंगापूरहून आणल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हे त्या वेळी पालम विमानतळावर उपस्थित होते. या मुलीवर अंत्यसंस्काराबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. ही मुलगी दिल्लीत ज्या भागात वास्तव्यास होती तेथील द्वारका उपनगरातील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला अग्नी देताना तिच्या वडिलांना शोक अनावर झाला. तिचे नातेवाईक व मित्र या वेळी उपस्थित होते.
इंदिरा गांधी विमानतळावर एअर इंडियाच्या खास विमानाने या मुलीचे पार्थिव पहाटे आणण्यात आले, तिचे आईवडील व कुटुंबीयही विमानाने तिच्यासमवेत आले. पहाटे साडेतीन वाजता हे विमान आले तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी तिचे आईवडील व भावाचे सांत्वन केले व शोकसंवेदना व्यक्त केली.
या वेळी दिल्ली पोलीस, सीमा सुरक्षा दल व जलद कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते, नंतर या तरुणीचा पार्थिव देह नैर्ऋत्य दिल्लीत ती जिथे राहत होती त्या निवासस्थानी नेण्यात आला. तिला उपस्थितांनी अंतिम श्रद्धांजली वाहिली. नंतर द्वारका सेक्टर २४ येथील स्मशानभूमीत पार्थिव नेण्यात आले. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, गृह राज्यमंत्री आर.पी.एन. सिंग, पश्चिम दिल्लीचे खासदार महाबळ मिश्रा, दिल्ली भाजप प्रमुख विजेंदर गुप्ता हे तिच्या अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित होते.
या तरुणीवर प्रथम दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार केल्यानंतर सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला होता, त्यानंतर हजारो नागरिकांनी मेणबत्त्यांसह शांततामय मार्गाने निदर्शने केली. दरम्यान, रविवारीही दिल्लीत नागरिकांनी निदर्शने केली.

अंत्यसंस्काराबाबत कमालीची गुप्तता
पोलिसांनी स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांना या तरुणीच्या अंत्यसंस्काराविषयी पूर्वकल्पना दिली होती. शेवटच्या क्षणापर्यंत या अंत्यसंस्काराची माहिती कुणालाही कळली नव्हती. लोकांनी जर तिथे गर्दी केली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या शंकेमुळे सरकारने याबाबत गुप्तता पाळली होती. सकाळी साडेसहा वाजताच अंत्यसंस्कार उरकण्याचा सरकारचा इरादा होता, पण हिंदू परंपरेप्रमाणे सूर्योदय झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येत नसल्यामुळे अखेर सकाळी साडेसात वाजता अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अंत्यसंस्कार शांततेत पार पडावेत यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व नंतर तिचा मृत्यू या घटनेच्या विरोधात दिल्लीत वातावरण तप्त असल्याने सरकारवर दडपण होते. पोलिसांनी शनिवारीच सरकारला सांगितले होते की, तिचा पार्थिव देह उत्तर प्रदेशातील बलिया या तिच्या गावी वाराणसी किंवा लखनौमार्गे नेण्यात यावा, पण सरकारने तसे करण्यास नकार दिला, असे सूत्रांनी सांगितले.
—————
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या युवतीच्या निधनानंतर व्यथित होऊन ट्विटरच्या माध्यमातून  सादर केलेली कविता.
समय चलते मोमबत्तियाँ, जल कर बुझ जाएँगी..
श्रद्धा में डाले पुष्प, जल हीन मुर्झा जायेंगे.
स्वर विरोध के और शांति के अपनी प्रबलता खो देंगे..
किन्तु ‘निर्भयता’ की जलाई अग्नि हमारे ह्रदय को प्रज्वलित करेगी..
जल हीन मुरझाये पुष्पों को हमारी अश्रु धाराएं जीवित रखेंगी.
दग्ध कंठ से ‘दामिनी’ की ‘अमानत’ आत्मा विश्व भर में गूंजेगी..
स्वर मेरे तुम, दल कुचलकर पीस न पाओगे.
मैं भारत की माँ बहेनियाँ बेटी हूँ.
आदर और सत्कार की मैं हकदार हूँ..
भारत देश मेरी हमारी माता हैं,
मेरी छोडो, अपनी माता की तो पहचान बनो!!
अमिताभ बच्चन