भारत-पाकिस्तानच्या संभाव्य मैत्री पर्वात पाकिस्तानची काश्मिरबाबत काय भूमिका असेल, हे जाणून घेण्यासाठी हुरियत कॉन्फरन्सचे सात सदस्यीय शिष्टमंडळ शनिवारी रात्री पाकिस्तानला रवाना झाले. मिरवैझ उमर फारूक यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ या दौऱ्यात पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी, पंतप्रधान रजा परवेज अश्रफ यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
२०१४ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकी लष्कर पूर्णपणे काढण्यात येणार आहे. या घडामोडींनंतर अमेरिका भारत आणि पाकिस्तानकडे मोर्चा वळविणार असून या दोन देशांत संवादाची व मैत्रीपूर्ण संबंधांची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अमेरिकेची इच्छा असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या पाश्र्वभूमीवर या संभाव्य मैत्री पर्वात काश्मिरबाबत पाकिस्तानची काय भूमिका असेल, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे फारुक यांनी पत्रकारांना सांगितले. अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर भारत-पाकिस्तानबाबत अमेरिका जे धोरण ठरवेल, त्याचा पुढील २० वर्षे काश्मिर खोऱ्यावर परिणाम होईल, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने काश्मिरच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराबाबत जो ठराव केला आहे, त्याबाबत भविष्यात पाकिस्तानचे काय धोरण असेल, यावरही आम्ही या दौऱ्यात चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
भारत आणि पाकिस्तानसाठी काश्मिर हा केवळ राजकीय प्रश्न आहे, मात्र भारत सरकारच्या उदासीन धोरणांमुळे काश्मिरमध्ये ‘जैसे थे’ परिस्थिती आहे, यात बदल करण्यासाठी आणि काश्मिरच्या भल्यासाठी आम्ही कोणाशीही संवाद साधण्यास तयार आहोत, काश्मिरची समस्या केवळ चर्चेनेच सुटू शकते, यावर आमचा विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कोणतेही औचित्य नसताना आखलेल्या या दौऱ्यामुळे हुरियतच्या नेत्यांच्या हेतुबाबत शंका व्यक्त होत आहे. पाकिस्तानमधील आगामी निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर तेथील सत्ताधाऱ्यांचे हात बळकट करण्यासाठीच हा दौरा काढण्यात आल्याचे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.