माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारधनाची सोशल मीडियांच्या माध्यमातून कायमस्वरुपी जपणूक करण्यासाठी त्यांचे ट्विटर अकाऊंट नव्या स्वरुपात चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावने त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांचे जवळचे सहकारी श्रीजन पाल सिंग यांनी सांगितले. या अकाऊंटच्या माध्यमातून डॉ. कलाम यांचे विचार, त्यांनी हाती घेतलेले कार्य, त्यांची शिकवणूक लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. हे अकाऊंट पूर्णपणे डॉ. कलाम यांना समर्पित असेल, असे श्रीजन पाल सिंग यांनी एका ट्विटच्या साह्याने मंगळवारी सांगितले.
तरुणांना आणि सामान्यांना प्रोत्साहन देणारी कलाम यांची वाक्ये, त्यांच्या वेगवेगळ्या भाषणातील लक्षवेधक मुद्दे, त्याचबरोबर त्यांच्या विंग्ज ऑफ फायर, इंडिया २०२०, इग्निटेड माईंड्स या पुस्तकातील विचार या ट्विटर अकाऊंटवर प्रकाशित करण्यात येणार आहेत. श्रीजन पाल सिंग हेच या अकाऊंटचे काम पाहणार आहेत.