इंग्लिश फलंदाजांना टिपण्यासाठी रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात स्वतःच अडकलेल्या भारतीय फलंदाजांना आणखी एकदा नामुष्की सहन करावी लागली आहे. जागतिक कसोटी क्रमवारीत पहिल्या २० फलंदाजांमध्ये तीन ते चार जागा पटकवण्याची सवय असलेल्या भारतीय फलंदाजांपैकी एकही फलंदाज नव्याने जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या वीस फलंदाजांत आपली जागा राखू शकलेला नाही. विक्रमवीर सचिन तेंडुलकरही २२व्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने आपले पहिले स्थान राखले आहे.
एकेकाळी फिरकीला सामोरे जाणारे सर्वोत्तम फलंदाज असा भारतीय फलंदाजांचा लौकीक होता. मात्र वेगवान गोलंदाजीपुढे हडबडून जाणारे भारतीय फलंदाज आता इंग्लंडच्या फिरकी माऱयासमोर नांगी टाकू लागले. सचिन तेंडुलकरसारखा फिरकी गोलंदाजांना पॅडल स्वीप किंवा लाँग ऑनवरून बाहेर भिरकावून देणारा फलंदाज इंग्लंडची गोलंदाजी बिचकून खेळू लागला आणि आता त्याची घसरण होऊन तो २२व्या स्थानावर फेकला गेला आहे. विरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा यांच्या स्थानातही घसरण झाली असून ते सध्या अनुक्रमे २५ आणि २६ या स्थानांवर आहेत. विराट कोहलीच्या क्रमवारीत चार क्रमांकांची सुधारणा झाली असून सध्या तो ३७ व्या स्थानावर आहे. तर कप्तान महेंद्रसिंग ढोणीने आपला ३८ वा क्रमांक कायम राखण्यात यश मिळवले आहे.
गोलंदाजांची कामगिरीही काही फार आश्वासक नसून प्रग्यान ओझा या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाजाच्या क्रमवारीत चार क्रमांकांची घसरण झाली आहे. सध्या ओझा ९ व्या क्रमांकावर घसरला आहे. मात्र आर. अश्विनने दोन जागा पुढे येत २० व्या क्रमांकावर आपला दावा सांगितला आहे. सुमार कामगिरीमुळे संघाबाहेर गेलेल्या झहीर खानच्या क्रमवारीत कोणतीही घसरण झाली नसून त्याचा १५ वा क्रमांक कायम आहे. तर इशांत शर्माने पुनरागमनात चमक दाखवत ३२व्या स्थानावर उडी मारली आहे.