मेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून २०१४ मध्ये निघून गेल्यानंतर अफगाणिस्तानला भारताचाच मोठा आधार आहे, असे प्रतिपादन दक्षिण आशियाविषयक परराष्ट्र उपमंत्री रॉबर्ट ब्लेक यांनी बुधवारी केले असून दक्षिण आशियासंबंधात भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा व विश्वासू सहकारी आहे, असे स्पष्ट केले आहे.
अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या आशिया आणि पॅसिफिक उपसमितीसमोर बोलताना ब्लेक यांनी भारताची जोरदार पाठराखण केली आहे.
भारताने आजवर अफगाणिस्तानचा वापर पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेतील प्याद्यासारखाच केला, असे धक्कादायक विधान अमेरिकेतील महत्त्वाचे नेते चक हेगेल यांनी केले होते. २०११ मधील त्या विधानाची चित्रफित नुकतीच जारी झाली असतानाच ब्लेक यांनी केलेल्या या विधानाला मोठे महत्त्व आले आहे. हेगेल यांना परराष्ट्रमंत्री करण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा प्रयत्नशील असताना त्यांनी भारताबाबत अमेरिकेच्या आजवरच्या धोरणाशी अत्यंत विसंगत विधान केल्याने भारतातही तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. हेगेल यांच्या विधानांनी झालेली हानी दूर करण्याचा भाग म्हणून ब्लेक यांनी भारताबाबत गौरवोद्गार काढल्याचे मानले जाते.
दक्षिण आशियासंबंधातील कोणत्याही चर्चेची सुरुवात भारतापासूनच होणे अपरिहार्य आहे, असेही ब्लेक म्हणाले. सध्या दुसऱ्याच्या मदतीवर अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था उभी आहे. भारतामुळे तिचे रुपांतर उद्योगाधारित अर्थव्यवस्थेत होईल, अशी अमेरिकेला आशा आहे.
ब्लेक हे गेल्याच आठवडय़ात भारतभेटीवर होते. त्यावेळी अफगाणिस्तान आणि भारतीय प्रतिनिधींसह त्यांनी चर्चाही केली होती. अफगाणिस्तानात भारताच्या अनेक महत्त्वाकांक्षी गुंतवणूक योजना आहेत. अफगाणिस्तानातील उद्योग व्यवसायाला गती देण्याचे काम भारताने केले आहे, असेही ते म्हणाले.