पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेला राडा आणि ज्येष्ठ गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमाला झालेल्या विरोधावरून भारताला बहुविविधता जपण्याचे सल्ले देऊ करणाऱया पाकिस्तानला मंगळवारी भारताने खडेबोल सुनावले. पाकिस्तानमध्ये सहिष्णुता आणि बहुविविधतेची अवस्था काय आहे हे साऱयांनाच माहित आहे. भारताला पाकिस्तानकडून सहिष्णुता आणि बहुविविधतेचे धडे शिकण्याची गरज नाही. जर भारतात काही उणीवा असतील तर त्या भरून काढण्यात देश सक्षम आहे, असे भारताच्या उच्च पदस्थ सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी व्यक्तींच्या भारत भेटीतील कार्यक्रम उधळून लावण्यात आल्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत पाकच्या परराष्ट्र खात्याने भारताला बहुविविधता जपण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला होता. मुंबईत गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करणे असो किंवा खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर झालेले शाईफेकीचे प्रकरण, अशाप्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी भारताने घ्यायला हवी, असे पाकिस्तानच्या दूतावासाकडून सांगण्यात आले. त्यावर भारताने आज प्रत्युत्तरात पाकला कडक शब्दांत फटकारले. उफा करारानुसार गोष्टी साध्य न होण्यास पाकिस्तानमधील स्थानिक राजकारण कारणीभूत आहे. पाकिस्तानमध्येही काही अडचणी आहेत. पाकची बहुविविधता आणि सहिष्णुतेची सद्य परिस्थिती सर्वज्ञात आहे. पाकने उगाच राईचा पर्वत करू नये, असे उच्च पदस्थ सुत्रांनी पाकला बजावले.