पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मांडलेला चार कलमी शांतता प्रस्ताव भारताने फेटाळला असून पाकिस्तानने केवळ सीमेवरील दहशतवादाला आळा घालावा असे म्हटले आहे. हा दहशतवाद थांबवला तरच चर्चा सुरू करता येईल असे भारताचे म्हणणे आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सूत्रधार अतिरेक्यांनी २६/११ चा मुंबई हल्ला केला. ते खुलेआम भटकत आहेत व पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग बेकायदा बळकावला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आमसभेत केलेल्या भाषणात  काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता.

स्वराज यांनी सांगितले की, दहशतवाद हे कायदेशीर हत्यार किंवा धोरण आहे असे म्हणणे कुणीही स्वीकारणार नाही. जागतिक समुदायाने आता दहशतवाद अजिबात खपवून घेऊ नये. जे देश अतिरेक्यांना पैसा पुरवतात व आश्रय देतात, शस्त्रे पुरवतात त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली पाहिजे.

चर्चा व दहशतवादी कारवाया या दोन गोष्टी एकाचवेळ शक्य नाहीत, असे ठामपणे सांगताना स्वराज यांनी असे स्पष्ट केले की, भारताची चर्चेस तयारी आहे पण पाकिस्तान पसरवित असलेल्या दहशतवादामुळे द्विपक्षीय संबंधात अडथळे येत आहेत. काल पंतप्रधान शरीफ यांनी शांततेसाठी चार कलमी प्रस्ताव मांडला पण त्यासाठी चार मुद्दय़ांची गरजच नाही. आम्हाला फक्त दहशतवादी कारवाया थांबलेल्या दिसल्या पाहिजेत. स्वराज यांनी आमसभेत २५ मिनिटे घणाघाती भाषण करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची व त्यांच्या ढोंगीपणाची लक्तरे काढली.

दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी रशियातील उफा येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा करण्याचे मान्य केले होते, पण पाकिस्तानने हुरियतशी चर्चा करण्याचा घाट घातला व त्याला भारताने विरोध करताच चर्चा रद्द केली होती. शरीफ यांनी चार कलमी प्रस्तावात जम्मू-काश्मीरचे निर्लष्करीकरण, सियाचेनमधून सैन्याची बिनशर्त व परस्पर सामंजस्यातून माघारी, दोन्ही देशात कुठल्याही परिस्थितीत बळाच्या वापराबाबत संयम ठेवणे व २००३ मधील शस्त्रसंधी कराराचे पालन करणे असे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची चर्चा दहशतवादाच्या मुद्दय़ावर झाली पाहिजे अशी अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची चर्चा पाकिस्तानने हुरियतचा कार्यक्रम घुसवल्याने रद्द झाली व ती पाकिस्ताननेच रद्द केली, असे त्या म्हणाल्या.

जम्मू-काश्मीरशिवाय द्विपक्षीय संवाद नाही- बिलाल अहमद
संयुक्त राष्ट्रे : सीमेपलीकडून दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा शक्य नाही या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या इशाऱ्यावर पाकिस्ताननेही त्याचा हेका कायम ठेवला असून जम्मू-काश्मीरशिवाय कुठलाही द्विपक्षीय संवाद शक्य नाही असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानी स्थायी दूतावासाचे प्रतिनिधी बिलाल अहमद यांनी असा आरोप केला की, भारत नेहमी दहशतवादाच्या नावाखाली द्विपक्षीय चर्चा टाळत आहे.

आम्ही कालच पाकिस्तानातील हल्ल्यात भारताचा कसा हात आहे याचे पुरावे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना दिले आहेत. त्यात बलुचिस्तान व काश्मिरात भारताचा दहशतवादी हस्तक्षेप तसेच भारताच्या सुरक्षा व गुप्तचर संस्थांचा तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या अतिरेक्यांशी संबंध आहे असा आरोप बिलाल अहमद यांनी केला.