मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य पाहता पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तेथील न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरून हा खटला पाकिस्तान संथगतीने हाताळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या भेटीसाठी ही वेळ योग्य नसल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री रेहमान मलिक यांच्या नियोजित भारतभेटीबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले की, भारत खुल्या मनाने चर्चा करेल आणि ज्या पद्धतीने आपल्याला कारवाई हवी आहे त्या पद्धतीचा आग्रह धरेल. मात्र जास्त अपेक्षा ठेवू नये, असेही ते म्हणाले.
या खटल्याची सुनावणी शीघ्रगतीने व्हावी अशी विनंती भारताने केली आहे आणि त्या पद्धतीने ती होईल, असे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानच्या तपास यंत्रणेने दहशतवादविरोधी न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर खुर्शीद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लष्कर-ए-तय्यबाच्या प्रशिक्षण छावण्यांची सिंध प्रांतातील छायाचित्रे आणि मुंबईवर हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांनी वापरलेली बोट यांची छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. लष्करचा कमांडर लखवी आणि त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे.