अण्वस्त्र निर्मूलनासाठीच्या चर्चेत भाग घेण्यासाठी भारताने त्याचा जवळचा मित्र असणाऱ्या इराणचे मन वळवावे, अशी अपेक्षा फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते येथे माधवराव शिंदे स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते.
आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतीय लोकशाहीचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि शताब्दी साजरी करीत असलेल्या भारतीय चित्रपटाचे कौतुक केले. भारत ही शांततेसाठीची शक्ती असल्याचे नमूद करून ते म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्संघाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व भारताला मिळाले पाहिजे. जगातील १७ टक्के लोक या देशात राहतात. संघर्ष टाळून चर्चेतून तोडगा काढण्याचे भारताचे धोरण आहे. जागतिक सुरक्षिततेसाठी भारताची उपस्थिती आवश्यक आहे.’’
इराणसंदर्भात त्यांनी सांगितले, ‘‘भारत आणि भारतीयांचे इराणशी घनिष्ठ संबंध असल्याची आम्हाला कल्पना आहे. या संबंधाचा उपयोग भारताने आंतरराष्ट्रीय र्निबध पाळण्यासाठी तसेच वाटाघाटींमध्ये सहभागी होण्यासाठी इराणचे मन वळविण्यासाठी करावा, असे आम्हाला वाटते. मालीतील दहशतवादाविरोधातील लढय़ात भारताने फ्रान्सला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्याचे आभार मानतो.’’