भारताने स्वदेशी बनावटीच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र संरक्षण कवचाची शुक्रवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र संरक्षण कवच आता राजधानी दिल्लीत वापरण्यास सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.
चाचणीचा भाग म्हणून एक सुपरसॉनिक इंटरसेप्टर मिसाईल (स्वनातीत आंतरछेदक क्षेपणास्त्र) सोडण्यात आले. त्यामुळे ओडिशाच्या किनाऱ्यावर दुसरे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले. दुपारी १२ वाजून ५२ मिनिटांनी आंतरछेदक क्षेपणास्त्राने लक्ष्य क्षेपणास्त्राला १४.५ कि.मी उंचीवर असताना नष्ट केले, असे संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) चे प्रवक्ते रवीकुमार गुप्ता यांनी सांगितले. भारत आता बहुस्तरीय आंतरखंडीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा तयार करीत आहे. आम्ही राष्ट्रीय राजधानीच्या भागात २०१४ पर्यंत ही संरक्षण कवच यंत्रणा लावणार आहोत. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या व शत्रू क्षेपणास्त्र च्या भूमिकेत असलेल्या पृथ्वी या क्षेपणास्त्राचा आंतरछेदक क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला. पृथ्वी क्षेपणास्त्र चलत प्रक्षेपकावरून १२.५३ वाजता सोडण्यात आले होते. अवघ्या चार मिनिटांत अतिप्रगत हवाई सुरक्षा क्षेपणास्त्राने व्हीलर बेटावरून त्याचा वेध घेतला. ट्रॅकिंग रडारच्या मदतीने त्याला संदेश मिळाले होते व त्यामुळे पृथ्वी क्षेपणास्त्राचा नेमका मार्ग या आंतरछेदक क्षेपणास्त्राला समजला होता. या वेळी डीआरडीओचे अधिकारी, तीनही संरक्षण दलांचे अधिकारी व सरकारी अधिकारी उपस्थित होते.     

काय आहे क्षेपणास्त्र?
*  ७.५ मीटर लांब
*  घन प्रणोदकाचा वापर
*  दिशादर्शन प्रणालीचा   वापर
*  उच्च तंत्राधिष्ठित संगणक   व इलेक्ट्रो मेकॅनिकल     अ‍ॅक्टिव्हेटरचा वापर.
*  स्वत:चा चलत प्रक्षेपक   आधुनिक रडारचा वापर