भारतीय लष्कराला दारूगोळ्याची कमतरता भासत असल्याची कबुली लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र सरकारला या बाबीची कल्पना असून त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्कराकडे दारूगोळ्याची कमतरता असल्याचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला आहे आणि ही बाब एका विशिष्ट सीमेशी जोडली जाऊ नये. भारतीय सैन्यात शस्त्रास्त्रे सामायिक असून, काही दारूगोळ्यांची कमतरता आहे. हा साठा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख ले.ज. डी. एस. हुडा यांनी पत्रकारांना सांगितले.
दारूगोळ्याच्या कमरतेमुळे लष्कराच्या दैनंदिन मोहिमांवर काही परिणाम होत नाही. तेवढय़ा प्रमाणात दारूगोळा आपल्याकडे उपलब्ध आहे. तथापि युद्धजन्य परिस्थितीत फार मोठा साठा तयार असायला हवा. संरक्षण मंत्रालयाला याची कल्पना असून हा प्रश्न सोडवण्याचे ते प्रयत्न करीत आहेत, असे हुडा म्हणाले.
आपल्या सैनिकांच्या गरजांची लष्कराला कल्पना असून, त्याबाबत आम्ही संवेदनशील असल्याचेही हुडा यांनी सांगितले.