भारतीय दुतावासातर्फे कैरो येथील दुतावासाच्या कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भारताचे इजिप्तमध्ये कार्यरत असणारे राजदूत संजय भट्टाचार्य यांनी केले होते. तसेच त्यांनी या कार्यक्रमाचे श्रेय इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सीसी यांना दिले. या कार्यक्रमाला इजिप्तमधील राजकीय नेते, दोन्ही दूतावासाचे अधिकारी व कलाकार उपस्थित होते.
सर्व भारतीय नागरिकांकडून इजिप्तमधील नागरिकांसाठी भट्टाचार्य यांनी प्रार्थना केली. तसेच त्यांच्या पत्नी सौ. रानू भट्टाचार्य यांनी दोन्ही देशांमध्ये सोहार्दाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्याचप्रमाणे, इजिप्तचे परराष्ट्र मंत्री नागाला अल- अवाहनी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. भारत व इजिप्तचे संबंध पंडित जवाहरलाल नेहरू व गमाल अब्देल नासेर यांच्यापासून मैत्रीपूर्ण आहेत आणि ती मैत्री आज दोन्ही देश वाढवत आहेत अशा भावना अवाहनी यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आम्हाला भारताकडून प्रत्येक वर्षी मोठ्याप्रमाणात मदत मिळते व आमच्या देशातील युवा पिढी भारतात वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण घेतअसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भारत व इजिप्तमधील संबंध अधिकाधिक वृद्धिंगत व्हावेत याकरता आम्ही प्रयत्नशील असून भारत हा विज्ञान व कला क्षेत्रात अतिशय प्रगत देश असल्याचे इजिप्तमधील राजकीय नेते याह्या अब्दूल गमाल यांनी सांगितले.