रेल्वे प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत भारतीय रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट मिळणार आहे. नव्या रंगाढंगातील आकर्षक डबे दिवाळीपर्यंत रेल्वेप्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. भोपाळ येथील कारखान्यात या नव्या रेल्वे डब्यांच्या बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून डब्यांच्या डिझाईनसाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ या संस्थेची मदत घेतली जात आहे. सध्या सेवेत असलेल्या डब्यांपेक्षा हे नवे डबे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार असून त्याचे डिझाईन देखील तितकेच आकर्षक ठेवण्यावर भर दिला जात आहे. मात्र, हे डबे केवळ लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी डिझाईल केले जात आहेत. सामान्य आणि स्लिपर डब्यापासून एसी-१, २ आणि ३ अशाप्रकारे सर्वच श्रेणीतील डब्यांचे डिझाईन बदलण्यात येत आहे.

डब्याची अंतर्गत रचना, आसनव्यवस्था, शौचालय या सर्वबाबतींत मोठे बदल या नव्या डब्यांत करण्यात येणार आहेत. ‘वन इंडिया, वन रेल्वे’ या संकल्पनेला शोभतील अशा रंगसंगतीचे आणि सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या डब्यांची निर्मिती केली जावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेल्वे मंत्रालयाला निर्देशानुसार नव्या डब्यांची रचना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या रेल्वे डब्यांचे अंतिम स्वरुपावर शिक्कामोर्तब होण्याआधी जगातील नऊ देशांतील सुप्रसिद्ध डिझाईनर्स आणि उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली जाणार आहे. पुढी दोन दिवसांत चीन, जपान, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंड येथील तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा होणार असून या चर्चेतून समोर येणाऱया मुद्द्यांवर काम करून डब्यांच्या डिझाईनबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.