दंतचिकित्सक असलेल्या भारतीय महिलेच्या आर्यलडमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी भारताने चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी आयरिश प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून त्या तपासाबाबतची माहिती मिळावी, अशी मागणी भारताने गुरुवारी येथील आयरिश दूतावासाकडे केली आहे.
आर्यलडमध्ये वास्तव्यास असलेल्या सविता हलप्पमवार ३१ या भारतीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सविता यांच्या गरोदरपणात काही गुंता निर्माण होता. मात्र हे कॅथॉलिक राष्ट्र असल्याचे सांगत येथील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे शरीरात विष पसरून सविता हिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी आयरिश प्रशासनाने चौकशीसाठी दोन समित्यांची नेमणूक केली होती. या चौकशीचा अहवाल मिळावा यासाठी भारताने दिल्लीतील आयरिश दूतावासाकडे विचारणा केली. सविता यांचा मृत्यू दुर्दैवी असून डब्लिन येथील भारतीय दूतावासातर्फे या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आयरिश सरकारकडे योग्य पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी दिली.
दरम्यान, आयरिश आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. हलप्पनवार कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खाची आम्हाला जाणीव असून या प्रकरणी लवकरच तपास करून सत्य समोर आणण्यात येईल, असेही आयरिश दूतावासाने स्पष्ट केले. आयरिश पंतप्रधान आणि आरोग्य मंत्र्यांनी सविताच्या मृत्यूबाबत दुख व्यक्त करून या प्रकरणी सर्वोच्च पातळीवर चौकशी करण्यात येणार असल्याचेही दूतावासातर्फे सांगण्यात आले.     
प्रकरण काय?
आर्यलडमध्ये वास्तव्यास असलेल्या सविता हलप्पमवार (३१) या भारतीय महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सविता यांच्या गरोदरपणात काही गुंता निर्माण होता. मात्र हे कॅथॉलिक राष्ट्र असल्याचे सांगत येथील डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे शरीरात विष पसरून सविता हिचा मृत्यू झाला होता.