एकूण १०० प्रमुख भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असून त्यामुळे तेथे ९१ हजार रोजगार निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील एकूण ५० पैकी ३५ राज्यांत ही रोजगारवाढ दिसून येत आहे. अमेरिकेत दक्षिणेकडील टेक्सास राज्यात सर्वाधिक ३.८४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली असून पेनसिल्वानियात ३.५६ अब्ज, मिनेसोटात १.८ अब्ज, न्यूयॉर्कमध्ये १.०१ अब्ज, न्यूजर्सीत १ अब्ज या प्रमाणे गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय उद्योग महासंघ व ग्रँट थॉर्टन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील २० खासदारांनी एक अहवाल नुकताच जाहीर केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल कॅपिटॉल हिल येथे प्रसृत करण्यात आला. भारत चौथा वाढता परकीय गुंतवणूक स्रोत म्हणून उदयास येत आहे व भारतीय गुंतवणुकीचा अमेरिकेत सकारात्मक परिणाम झाला आहे, असे सिनेटच्या भारतीय दबावगटाचे सहअध्यक्ष सिनेटर मार्क वॉर्नर यांनी सांगितले. या अहवालानुसार पाच राज्यांत मोठय़ा प्रमाणात
रोजगार वाढ झाली असून त्यात न्यूजर्सी ९३००, कॅलिफोर्निया ८४००, टेक्सास ६२००, इलिनॉइस ४८००, न्यूयॉर्क ४१०० याप्रमाणे रोजगार निर्मिती झाली आहे.
भारतीय उद्योग महासंघाने म्हटले आहे, की भारतीय उद्योगांचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत होत आहेत, असे राजदूत अरुण के सिंग यांनी सांगितले. भारतीय कंपन्या केवळ गुंतवणूक करीत नसून रोजगार निर्मितीही करीत आहेत. येथील समाजाच्या प्रगतीतही त्यांचा वाटा आहे. खरेतर त्यांचे पन्नासही राज्यांतही अस्तित्व आहे पण ३५ राज्यात ते ठळकपणे जाणवते आहे. गेल्या वर्षांपासून दोन्ही राज्यांतील संबंध आणखी विस्तारले आहेत. अहवालानुसार ८४.५ टक्के कंपन्या अमेरिकेत गुंतवणूक करीत आहेत. नव्वद टक्के कंपन्या येत्या पाच वर्षांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सामावून घेणार आहे.