‘आपल्या मुलांना आपण पुरेसे संरक्षण देऊ शकतो काय.. एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या मूलभूत कर्तव्यपूर्तीत कमी पडतो आहोत काय.. स्वतशी प्रामाणिक राहून या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आता आली आहे.. त्यात आपण कमी पडलो तर दोष आपलाच आहे.. असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी माझे प्रशासन घेईलच..’ अशा शब्दांत अध्यक्ष बराक ओबामा यांनी कनेक्टिकट गोळीबारातील मृतांना सोमवारी श्रद्धांजली वाहिली.
कनेक्टिकटमधील न्यूटाऊन गावातील सॅण्डी हूक एलेमेंटरी शाळेत मागील आठवडय़ात एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला. त्यात २० लहानग्यांचा समावेश होता. या प्रकाराने संपूर्ण जगात खळबळ उडाली. सोमवारी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओबामा न्यूटाऊन येथे आले होते.
या वेळी त्यांनी एकूणच अमेरिकी समाजव्यवस्थेबद्दल चिंता प्रकट केली. ‘आपण आपल्या मुलांना पुरेसे संरक्षण देऊ शकत नाही. आपले शस्त्रपरवान्याचे कायदे प्रगल्भ आहेत. असे असतानाही तरुणांच्या हातात शस्त्रे येतात आणि त्याचा बेताल वापर केला जातो. हे चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांपासून लहान मुले ही अशा माथेफिरूंची ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहेत. यासाठी आपली समाजव्यवस्थाच कारणीभूत आहे’, असे ओबामा म्हणाले. सभागृहात उपस्थित असलेल्यांचे दुख केवळ आपल्या शब्दांनी हलके होणारे नाही याची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळेच यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी आपले प्रशासन कठोर उपायांची अंमलबजावणी करेल याविषयी सर्व नागरिकांनी खात्री बाळगावी असेही ओबामा म्हणाले. ज्यांना आपल्या लहानग्यांचा विरह सहन करावा लागला आहे त्यांच्या दुखात संपूर्ण अमेरिका सहभागी असल्याचेही ते म्हणाले. शाळेत घुसून माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार करण्याचा हा ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील चौथा प्रसंग आहे, हे विशेष. शस्त्रउपलब्धतेवर र्निबध आणण्याची डेमोक्रेटिक पक्षाची जुनीच मागणी असून या निमित्ताने तिला वाढता जनाधार लाभत आहे.
कॅलिफोर्नियात गोळीबार
दक्षिण कॅलिफोर्नियातील एका मॉलमध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या व्यक्तीने मॉलच्या पार्किंग परिसरात बंदुकीच्या ५० फैरी झाडल्या. मात्र, त्यात कोणीही जखमी झाले नाही. मार्कोस गुरोला असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबारामुळे तातडीने मॉल बंद करण्यात आला.
माथेफिरूला अटक
इंडियाना राज्यातील सेडार लेक परिसरात पोलिसांनी एका ६० वर्षीय वृद्धाला शुक्रवारी अटक केली. व्हॉन मेयेर असे या वृद्धाचे नाव असून त्याने त्याच्याकडील ४७ बंदुका व काडतुसे घेऊन एका शाळेत घुसून अनेकांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याने पत्नीलाही जाळून टाकण्याची धमकी दिली. त्याच्या शेजारच्यांनी पोलिसांना ही माहिती देताच पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन मेयेरकडील शस्त्रे जप्त केली व त्याला अटक केली.     
० कनेक्टिकट हत्याकांडातील बळींना श्रद्धांजली
० हिंसाचाराच्या घटना अद्याप सुरूच
० ओबामा यांचे कठोर धोरणाचे संकेत
० शस्त्रउपलब्धतेवर अंकुश आणण्याची
*   डेमोक्रेटिक पक्षाची पुन्हा मागणी

तरुणाच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू
कनेक्टिकटमधील गोळीबाराने संपूर्ण अमेरिका हादरली असतानाच कन्सास प्रांतातील टोपेका येथे एका माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. टोपेका येथील एका किराणा दुकानाच्या परिसरात एक वाहन संशयास्पद स्थितीत आढळल्याची खबर पोलिसांना मिळाली. या वाहनाची तपासणी करण्यासाठी कॉर्पोरल डेव्हिड गोजिआन आणि पोलीस अधिकारी जेफ अ‍ॅथर्ली हे दोघे घटनास्थळी पोहोचले. मात्र, वाहनाच्या मालकाने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात दोघांनाही जबर दुखापत होऊन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. माथेफिरू तरुण अद्याप फरारी असून त्याचा शोध जारी असल्याचे टोपेका पोलिसांतर्फे सांगण्यात आले. या गोळीबाराने परिसरात चांगलीच घबराट पसरली आहे.