मधुमेह झालेल्या रुग्णाला हृदयविकाराचाही धोका असतो. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर हृदयविकाराकडेही लक्ष देत असतात. पण ‘टाइप १’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील मधुमेहग्रस्तांनी दररोज ठरावीक वेळी इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याऐवजी इन्सुलिन पंपाचा वापर केला तर त्यांना असलेल्या हृदयरोगाचा धोका कमी होतो, असा निष्कर्ष संशोधकांनी एका अभ्यासाअंती काढला आहे.
इसाबेल स्टायनेक यांच्या नेतृत्वाखाली स्वीडनमधील सालग्रेन्स्का अकादमीतील संशोधकांनी काही मधुमेहग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला.
२००५ ते २०१२ या काळात स्वीडनमधील ‘टाइप १’ मधुमेह झालेल्या १८,१६८ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी २,४४१ जण इन्सुलिन पंपाचा वापर करत होते, तर अन्य रुग्ण दररोज ठरावीक वेळी इन्सुलिनचे इंजेक्शन घेत होते.
जे लोक इन्सुलिन पंप वापरत होते त्यांचा हृदयविकाराचा धोका निम्म्याने कमी झाल्याचे संशोधकांना आढळले.
संशोधकांच्या मते याचे कारण इन्सुलिन पंपामुळे होणारा कायम आणि स्थिर इन्सुलिनचा पुरवठा हे असावे. पंपातून सतत ठरावीक प्रमाणात शरीरात इन्सुलिन जात असल्याने रक्तातील शर्करेचे प्रमाणही अधिक स्थिर राहते, तर दररोज ठरावीक वेळी इन्सुलिनचे इंजेक्शन घेणाऱ्या लोकांमध्ये इंजेक्शन घेतल्यानंतर लगेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तर नंतर कमी होत जाते.
रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक ढासळणे (हायपोग्लायसेमिया) ही स्थिती हृदयरोगात घातक ठरू शकते. इन्सुलिन पंपामुळे ते टाळता येते. त्यामुळेच हृदयरोगाचा धोका कमी झाला आहे. इन्सुलिन पंपद्वारे इन्सुलिन पुरवठा ही सुरक्षित आणि परिणामकारक उपाययोजना आहे, असे मत या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

इन्सुलिन पंप आणि इन्सुलिचे इंजेक्शन याचा आम्ही अभ्यास केला. त्यांचे फायदे, धोके, दुष्परिणाम याचे परीक्षण केल्यानंतर इन्सुलिन पंप हृदयविकारासाठी उपयोगी असल्याच्या निष्कर्षांपर्यंत आम्ही आलो. ठरावीक वेळी इंजेक्शन घेणाऱ्या रुग्णांमध्ये इंजेक्शन घेतल्यानंतर लगेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि नंतर कमी होते. मात्र पंपातून सतत ठरावीक प्रमाणात इन्सुलिन शरीरात जात असल्याने रक्तातील शर्करेचे प्रमाण स्थिर राहते.   – इजाबेल स्टेनेक, शास्त्रज्ञ