शिक्षकदिनानिमित्त मुलांशी संवाद

राजकारणाचे क्षेत्र बदनाम झाले आहे, त्यामुळे चांगले लोक राजकारणात यायला घाबरतात हे खरे असले तरी अशी भीती बाळगणे सोडून सर्व थरातील चांगल्या व बुद्धिमान लोकांनी राजकारणात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. शिक्षक दिन उद्या असला तरी त्यांनी आजच संवाद साधला; ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अपयशाने नाउमेद न होता आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावेत, पालकांनी त्यांच्या करिअरविषयक निवडी मुलांवर लादू नयेत.
मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित झाले पाहिजेत, असे सांगून ते म्हणाले की, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने चारित्र्य प्रमाणपत्रापेक्षा विद्यार्थ्यांना शाळा सोडताना अभियोग्यता प्रमाणपत्र द्यावे. त्यात त्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा समावेश असेल. राजकारणाचे नाव बदनाम झाले आहे, लोक राजकारणात यायला घाबरतात पण चांगले लोक राजकारणात येत नाहीत त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
दिल्लीतील शाळांमधील ८०० विद्यार्थी व ६० शिक्षकांशी त्यांनी माणेकशॉ सभागृहात संवाद साधला. इतर नऊ राज्यांचे विद्यार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते. लोकशाहीत राजकीय पक्ष महत्त्वाचे असतात. सर्व क्षेत्रातील चांगली माणसे राजकारणात आली पाहिजेत, जेवढी चांगली माणसे येतील तेवढे देशाचे कल्याण होईल. जेव्हा महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळ उभी केली तेव्हा सर्व स्तरातील लोक सहभागी झाल्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले. वेगवेगळ्या व्यवसायातील प्रज्ञावंतांनी आठवडय़ाला एक तास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी द्यावा, म्हणजेच वर्षांला शंभर तास द्यावेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला सक्षमता प्राप्त होईल. राजकीय नेत्यांनी मात्र असे करू नये, कारण ते दुसरेच काही तरी शिकवतील असे त्यांनी विनोदाने सांगितले.
गोव्याच्या एका विद्यार्थ्यांने मोदी यांना त्यांचा आवडता खेळ विचारला त्यावर ते म्हणाले की, राजकारणी जे खेळ खेळतात ते तुम्हाला माहित आहे. आपण तरूण असताना साधने मर्यादित होती, त्यामुळे आपण एका विशिष्ट खेळाचा पाठपुरावा करू शकलो नाही. फक्त झाडावर चढायला शिकलो तेवढेच. गावाकडे तळ्यावर कपडे धुवायला जायचो तेव्हा पोहायलाही शिकलो.