बोस्टनमध्ये बोइंग ७४७ ड्रीमलायनर विमानाच्या बॅटरीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत, असे अमेरिकेच्या तपास पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. विमानात आग लागल्याच्या घटनेनंतर एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी ड्रीमलायनरची उड्डाणे थांबविली आहेत.
सध्याच्या घडीला विमानाच्या बॅटरीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे संकेत मिळाले असल्याचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षा डेबोरा हर्समन यांनी वार्ताहरांना सांगितले. लिथियमची बॅटरी असल्याने त्यामध्ये शॉर्टसर्किट झाले असून पूर्ण तपासाअंती असे प्रकार का घडतात, याचा निष्कर्ष काढता येईल, असेही हर्समन म्हणाल्या.
अतिशय उच्च तापमानाला इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोड यांच्यात अनियंत्रित रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे ‘थर्मल रनवे’ने बॅटरीत आग लागू शकते. मात्र अंतिमत: आम्ही उत्पादनातच काही दोष आहेत का, त्याचीही पाहणी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अद्याप आमचा तपास पूर्ण झालेला नसून प्रयोगशाळेत अजूनही असंख्य चाचण्या करावयाच्या आहेत. मात्र या चाचण्या किती कालावधीत पूर्ण होतील ते सांगता येणार नाही, असेही हर्समन म्हणाल्या.