भारतीय दंतवैद्य सविता हलप्पनवार हिच्या वादग्रस्त मृत्यूबाबत सुरू असलेल्या तपासकार्यात आता थेट आर्यलडच्या राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला आहे. सध्या सुरू असलेल्या तपासकार्याने जशी राष्ट्राची प्रतिमा जपली जाणे गरजेचे आहे तसेच तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणेही आवश्यक आहे.
आर्यलडचे राष्ट्रपती मायकेल हिग्निस यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे आर्यलड सरकारवरील दबाव वाढला आहे. सविताचे यजमान प्रवीण यांनी या दुर्घटनेची संपूर्ण पारदर्शी आणि खुली चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्याला जणू प्रतिसाद दिल्याप्रमाणेच हिग्निस यांनी आदेश दिले आहेत. या देशात स्त्रिया सुरक्षित आहेत, तसेच त्यांना गरोदरपणात उत्तम वैद्यकीय उपचार मिळतात, असा विश्वास या तपासातून प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्यलडच्या आरोग्य आणि सुरक्षा मुख्याधिकाऱ्यांनी नुकतीच या तपासाची चौकट स्पष्ट केली. तसेच या तपासासाठी तीन नवीन सदस्यांची घोषणा केली. प्रवीण यांनी सरकारतर्फे सुरू असलेल्या तपासकार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हे बदल करण्यात आले.
मात्र असे असले तरीही नवीन सदस्यांकडून केली जाणारी चौकशी ही पूर्वनियोजित पद्धतीनेच केली जाईल, अशी शक्यता ‘आयरीश टाइम्स’ या वृत्तपत्राने वर्तवली आहे. तसेच या चौकशीस सहकार्य करण्यास प्रवीण याने नकार दिला असून सविताच्या तब्येतीची वैद्यकीय कागदपत्रे चौकशी समितीसमोर खुली केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी प्रवीण यांच्या वकिलाने दिली असल्याचा दावाही या वृत्तपत्राने केला आहे.