पाकिस्तानने इसिस या दहशतवादी गटावर बंदी घातली आहे. इराक व सीरिया दरम्यानच्या पट्टय़ात या गटाने ताबा मिळवला असून, अनेक ठिकाणी खिलाफतची स्थापना केली आहे. इसिसचे पाकिस्तानात अस्तित्व नाही असेही पाकिस्तानने वारंवार सांगितले असले तरी त्या संघटनेवर बंदी घातली आहे.
‘द इस्लामिक स्टेट’ म्हणजेच अरबी भाषेत दाएश असे नाव असलेल्या या संघटनेवर बंदी घातल्याचे पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र खात्याच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला असून, संयुक्त राष्ट्रांनीही बंदी घातलेल्या इसिसच्या प्रत्येक हालचालीवर पाकिस्तान लक्ष ठेवणार आहे. पाकिस्तानात अनेकदा इसिसचे झेंडे फडकले असून, सरकारने मात्र त्यांचे देशात अस्तित्व असल्याचा इन्कार केला आहे.