भारतामध्ये व्यवसायिक रबर लागवडीची सुरुवात करणारे आयरिश वनस्पतीतज्ज्ञ जे.जे. मर्फी यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय रबर बोर्डाने घेतला आहे. कोट्टयाम जिल्ह्यातील येंडयार गावात मर्फी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. याच गावातल्या चर्चजवळील स्माशनभूमीत मर्फी यांचे १९५७ साली दफन करण्यात आले होते.
रबर बोर्डाने या स्माशनभूमीची अडीच एकर जागा संबंधित चर्चकडून ताब्यात घेतली असून या जागेवर मर्फी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती रबर बोर्डाच्या संचालिका शीला थॉमस यांनी दिली.
आर्यलडमधून अगदी लहान वयात भारतामध्ये आलेल्या जे.जे. मर्फी यांनी १९०२ मध्ये केरळमध्ये पहिल्यांदा रबर लागवम्ड केली. केरळमधील असखल जमीन  व्यवसायिक रबर लागवडीसाठी योग्य असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या उद्देशाने सर्वानी रबर लागवड करावी यासाठी प्रचार सुरु केला. त्यापूर्वी भारतामध्ये व्यवसायिक उद्देशासाठी रबर लागवड केली जात नसे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रबराची मागणी वाढल्यानंतर रबर लागवडीचे महत्व केरळमधील रबर उत्पादकांना लक्षात आले. सध्या देशात रबर लागवडीमध्ये केरळचा पहिला क्रमांक असून यासाठी मर्फी यांनी केलेले कार्य महत्वपूर्ण ठरल्याची माहिती थॉमस यांनी दिली.
केरळमधील अनेक शाळांना तसेच क्लबना मर्फी यांचे नाव देण्यात असले तरी त्यांच्या नावाने उभारण्यात येणारे हे पहिलेच स्मारक असल्याचे थॉमस यांनी स्पष्ट केले.