इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोक सर्वात भ्रष्ट असतात या बेलगाम वक्तव्यासाठी लेखक आशीष नंदी यांना पोलिसांतर्फे नोटिस पाठवण्यात आली आहे आणि आता पोलिस त्यांचा जवाब नोंदवणार आहे.  
जयपूर पोलिसांनी लेखक आशीष नंदी यांना आज (मंगळवार) एक नोटिस पाठवत जयपूर साहित्य महोत्सवात इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोकांच्या विरोधात केलेल्या बेलगाम वक्तव्याबाबत पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे.
जयपूर साहित्य महोत्सवाचे प्रायोजक संजय कपूर यांचीही पोलिस आज चौकशी करू शकते.
एका पोलिस अधिका-याने सांगितले की, ‘‘आम्ही आयोजकांना सम्मन पाठवला होता परंतू ते कार्यक्रमात व्यस्त होते आणि काल ते येऊ शकले नाहीत परंतू आज त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे’’. ते पुढे म्हणाले, ‘‘ आम्ही याचिकाकर्ता राजपाल मीणा यांचाही जवाब नोंदवणार आहोत.’’
अतिरिक्त पोलिस आयुक्त बीजू जॉर्ज जोसफ म्हणाले काल म्हणाले की नंदीच्या विरोधात सुरू असेलेल्या चौकशीमुळे आयोजकांना शहरातच थांबायला सांगण्यात आले आहे.
जयपूर येथे एससी/एसटी राजस्थान मंचचे अध्यक्ष राजपाल मीना यांनी त्यांच्याविरोधात दंडसंहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी हेतू) आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार नोंदविली आहे. तिची दखल घेऊन चौकशी सुरू केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.